टिनिटसमध्ये कोणते आवाज ऐकू येतात ?
घंटीच्या आवाजाबरोबरच कानात सूं सूं आवाज येणे, गर्जना, घडाळ्याची टिक टिक, खडखडाट, शिट्टी वा कुजबुजणे असे आवाजही ऐकू येतात. या ध्वनींना बाह्य स्रोत नसतो. चिंता आणि तणाव ‘टिनिटस’ वाढवते. तुम्हाला एक किंवा दोन्ही कानात ‘टिनिटस’चा अनुभव येऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु वृद्ध लोकांमध्ये हा आजार सामान्य आहे.
टिनिटसची कारणे काय असू शकतात ?
कानात संसर्ग होणे, कानात जास्तीचे मेण साचणे, ऐकण्यात अडचण येणे, मधल्या कानात स्नायू दुखणे यामुळे ‘टिनिटस’ची समस्या उद्भवू शकते. ‘मेनियर डिसीज’, रक्तवाहिन्यांमधील सूज ज्याला ‘एन्युरिझम’ म्हणतात, जबडाचे विकार, उच्च रक्तदाब, थायरॉइड रोग आणि उच्च कोलेस्टेरॉलमुळे देखील ‘टिनिटस’ होऊ शकतो. श्रवणविषयक ट्यूमर, कानाच्या हाडातील बदल, मायग्रेन आणि अशक्तपणा हीसुद्धा कारणे असू शकतात.
कोणत्या औषधांमुळे हा आजार होऊ शकतो ?
ऑस्पिरीन , लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे, क्लोरोक्विन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन आणि व्हिन्क्रिस्टाइन यांसारख्या काही कर्करोगविरोधी औषधांच्या उच्च डोसमुळे ही समस्या उद्भवू शकते.
‘टिनिटस’ची गुंतागुंत कोणती ?
ही समस्या तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. थकवा, तणाव, नैराश्य, डोकेदुखी, स्मृती समस्या, अपुरी झोप आणि कौटुंबिक जीवनात समस्या येऊ शकतात.
‘टिनिटस’ कसे टाळावे ?
श्रवणाची सुरक्षा करणे गरजेचे आहे. मोठ्या आवाजाचे एक्सपोजर मर्यादित करायला हवे. जर तुम्ही मोठ्या आवाजाच्या संपर्कात असाल तर नेहमी ध्वनी संरक्षण साधने घालायला हवी. कानाच्या संरक्षणाशिवाय मोठ्या आवाजात संगीत ऐकणे किंवा हेडफोनद्वारे जास्त वेळ संगीत ऐकणे श्रवणशक्ती कमी करू शकते आणि ‘टिनिटस’ होऊ शकते. हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा. नियमित व्यायाम करून ‘टिनिटस’ टाळता येऊ शकतो.
टिनिटस’वर उपचार काय ?
कानातील मेणचा अडथळा दूर करून ‘टिनिटस’ कमी करता येतो. औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेने कानातील रक्तवाहिन्यांच्या स्थितीवर उपचार केल्याने लक्षणे सुधारू शकतात. काही श्रवणयंत्रे आणि तुमची सध्याची औषधे बदलल्याने सुद्धा मदत होऊ शकते. ‘टिनिटस रिट्रेसिंग थेरपी’, ‘कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपी’ किंवा समुपदेशनाच्या इतर पद्धती मदत करू शकतात. ‘टिनिटस’चा उपचार औषधांनी केला जाऊ शकत नाही. औषधे त्याची तीव्रता कमी करू शकतात. एक्यूपंक्चर , जिन्कगो बिलोबा, मेलाटोनिन आणि झिंक सप्लिमेंट्स पर्यायी उपचार म्हणून उपयुक्त ठरतात.
डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा ?
‘टिनिटस’ची लक्षणे असतील, ज्याची सुरुवात डोक्याला आघात झाल्यानंतर किंवा डोकेदुखी आणि उलट्यानंतर दिसून येत असतील, जर आवाज मोठा असेल आणि चालताना तुमचा तोल जात असेल आणि ही लक्षणे अनेक आठवडे किंवा महिने टिकून राहत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा