Site icon sunflower hospital nagpur

लठ्ठपणा आणि कमी वजन ही आव्हाने

असंसर्गजन्य रोगांबद्दल ‘लॅन्सेट’ मधील अभ्यास काय सांगतो ?

देशातील प्रकरणांमध्ये लठ्ठपणाच्या वाढ झाल्याने हृदयविकार, पक्षाघात आणि मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचा भार लक्षणीय वाढला आहे.

सर्वांत मोठी चिंता काय ?

मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हा चिंतेचा विषय आहे. ताज्या निष्कर्षांनुसार, गेल्या २० वर्षांत मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या जवळपास १० पटीने वाढली आहे. याशिवाय प्रौढांमध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. पुरुषांसोबतच शहरी आणि निमशहरी महिलांमध्येही लठ्ठपणा वाढत आहेत. शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे असंसर्गजन्य आजाराचा धोका गंभीर होत आहे.

‘लॅन्सेट’चा अभ्यास भारतीय आरोग्य व्यवस्थेसाठी धक्कादायक आहे का ?

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, भारतात कोरोना संसर्गाच्या महामारीनंतर लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, अल्कोहोल, निकोटीन आणि मादक पदार्थांच्या सेवनाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. परिणामी, हृदयविकाराचा झटका, अर्धागवायूचा झटका, किडनी निकामी होणे आणि ‘स्लीप ॲपनिया’चे रुग्ण वाढले आहेत.

लठ्ठपणा व इतर असंसर्गजन्य रोग का होत आहेत ?

अभ्यासाचे सह-लेखक आणि मद्रास डायबिटिस रिसर्च फाउंडेशनचे प्राध्यापक डॉ. प्रदीप गुहा यांच्या मते, आम्ही डाळी, संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या यासारख्या संपूर्ण खाद्यपदार्थांकडे पाठ फिरवली आहे. आमच्या पारंपरिक आहारात प्राणिजन्य पदार्थ, मीठ, शुद्ध तेल, साखर आणि मैदा कमी होता, आता आपण या आहाराकडे वळलो आहोत ज्यामध्ये जास्त ऊर्जा आहे, परंतु पोषक तत्त्वे कमी आहेत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढताना दिसून येत आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात काही जोडले पाहिजे का ?

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पोषण व सकस आहाराच्या सवयी आणि खेळासारख्या शारीरिक हालचाली, आदी जोडणे गरजेचे झाले आहे.

कमी वजनाचा बाळांना समस्या निर्माण होतात का ?

खूप कमी वजन असलेल्या बाळांना नंतर काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, बौद्धिक व विकासात्मक, चयापचय आणि लठ्ठपणाच्या समस्या होऊ शकतात.

काय आपण हा ट्रेंड बदलू शकतो का ?

लठ्ठपणा वाढवण्यात साखरेचे अतिसेवन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अतिरिक्त तेल आणि तूपदेखील नुकसान करतात. शारीरिक हालचालींचा अभाव आणि भावनिक ताण हे लठ्ठपणात मोठी भूमिका बजावतात. आकस्मिक मृत्यू उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक ताण आणि हृदयविकाराच्या झटक्याचा घटना कमी करायच्या असतील तर आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. द-लॅन्सेट’ने प्रकाशित केलेला सध्याचा अभ्यास आपल्या उपखंडातील अयोग्य जीवनशैली दर्शविते, ज्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक हालचालींचा अभाव आणि अयोग्य आहार यांचा समावेश आहे. जन्मतः कमी वजन हे देखील भविष्यात मोठे आव्हान आहे.

Exit mobile version