आकस्मिक मृत्यूंना कसे टाळावे ?
आकस्मिक मृत्यूंना टाळण्यासाठी उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची पातळी यांसारख्या आरोग्यविषयक धोक्याची पूर्व सूचना देणाऱ्या घटकांचे मूल्यमानप करायला हवे. यात ईसीजी, ट्रेडमिल चाचणी आणि इकोकार्डिओग्राम आवश्यक आहे. धूम्रपानापासून दूर राहणे, अति मद्यसेवन आणि बैठ्या जीवनशैलीसोबतच जास्त ताणतणाव टाळणेही गरजेचे आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी चाचण्या करायला हव्यात. ‘कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन’चे (सीपीआर) ज्ञानही महत्त्वाचे आहे.
भावनिक आरोग्याबद्दल काय ?
सध्या नैराश्य, चिंता आणि आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. त्या टाळण्यासाठी चांगले कौटुंबिक वातावरण गरजेचे झाले आहे. याशिवाय, कमी स्क्रीन वेळ आणि सकारात्मक दृष्टिकोनही महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनात वास्तववादी ध्येय असायला हवे. तुमच्या आजूबाजूला चांगले मित्र असतील तर याची मदत होते. एकूणच सामान्य शारीरिक आरोग्यासाठी भावनात्मक आरोग्य राखणे गरजेचे आहे.
संसर्ग हे मोठे आव्हान असेल का ?
सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अँटिबायोटिक्सला प्रतिकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे ‘अँटिबायोटिक्स’चा ऊठसूट वापर टाळला पाहिजे. गंभीर आजारी रुग्णांनाही आवश्यक असेल तरच अँटिबायोटिक्स द्यायला हवे. व्हायरल, न्यूमोनिया, विशेषतः कोरोनाचा वारंवार संसर्ग होण्याची शक्यता असल्याने अँटिबायोटिक्सच्या वापराला घेऊन गंभीर होणे गरजेचे आहे. मधुमेही आणि वृद्धांना फ्लू विषाणूंविरुद्ध वार्षिक लसीकरण केले पाहिजे, व्हायरल न्यूमोनिया बहुतेकदा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होतो. यादरम्यान ज्येष्ठांनी अनावश्यक प्रवास टाळायला हवा. मास्क वापरणे, संक्रमित व्यक्तींपासून योग्य अंतर राखायला हवे.
हवामान बदलाचा आरोग्यावर काय परिणाम होतो ?
हवामान बदलाचा प्रभाव सतत वाढत आहे. अवकाळी पाऊस, पाणी साचणे, तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था यांमुळे मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या घटनांचे काय ?
मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या घटनांमध्ये निश्चितच वाढ होत आहे. ही वाढ सामान्यांमध्ये वाढलेली जागरूकता आणि सतत केले जात असलेले मूल्यांकन यांच्याशी देखील संबंधित आहे. बैठी जीवनशैली, लठ्ठपणा आणि फास्ट फूड संस्कृती याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. १३५/८५ पेक्षा कमी रक्तदाब राखणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये ‘एचबीए१सी’ ६.५ टक्के असणे आणि ‘एलडीएल कोलेस्टेरॉल ७० मिलीग्राम असणे गरजेचे आहे.
रस्ते अपघातांचे काय ?
रस्त्यावर होणारे मृत्यू टाळता येतात. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे, वाहन चालवण्यापूर्वी हेल्मेट, सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन करणे आणि मद्यपानापासून दूर राहणे या गोष्टींचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे वाहन चालविणे टाळायला हवे.
कर्करोग हे मोठे आव्हान असेल का ?
कर्करोग हे एक मोठे आव्हान ठरले आहे. लवकर निदान आणि उपचार हाच यावर पर्याय आहे. ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलोनिक कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी तरुणांमध्ये ‘एचपीव्ही’ लसीकरणास प्रोत्साहन दिले पाहिजे. नियमित व्यायाम, लठ्ठपणा आणि जंकफूड, धूम्रपान आणि मद्यपान टाळायला हवे.