‘व्हेरिकोज व्हेन्स’ लक्षणे काय आहेत ?
पायातील नसा म्हणजे शिरा गडद जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या दिसतात. काही शिरा दोरीसारख्या वळतात. या समस्येमुळे पाय जड होणे, जळजळ होणे, स्नायूमध्ये पेटके येणे आणि खालच्या पायांमध्ये सूज येणे आदी लक्षणे दिसून येतात, बराच वेळ बसून किंवा उभे राहिल्यानेदेखील वेदना वाढतात. याशिवाय, एक किंवा अधिक नसांभोवती खाज सुटणे, त्वचेचा रंग आणि कोरडेपणा आदी लक्षणे दिसून येऊ शकतात.
‘ व्हेरिकोज व्हेन्स’ कशामुळे होतो ?
ही समस्या कमकुवत किंवा खराब झालेल्या ‘व्हॉल्व्ह’ मुळे उद्भवू शकते. आपल्या धमन्या हृदयापासून शरीराच्या इतर भागात रक्त वाहून नेतात, नसा शरीराच्या उर्वरित भागातून हृदयाकडे रक्त परत करतात. पायातील रक्ताला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करावे लागते म्हणून त्यांना झडपा (व्हॉल्व्ह) असतात. या झडपा अकार्यक्षम किंवा खराब झाल्यास, रक्त परत येऊन नसांमध्ये जमा होते, ज्यामुळे नसा ताणल्या जातात, फुगतात किंवा वळतात.
कोणाला ‘व्हेरिकोज होण्याची शक्यता आहे ?
व्हेन्स’ व्हेरिकोज व्हेन्स’ कोणालाही होऊ शकतो. वय वाढण्याची प्रक्रिया हे मुख्य कारण ठरते. यात नसांच्या भिंती आणि ‘व्हॉल्व्ह’ पूर्वीप्रमाणे काम करत नाहीत आणि त्यांची लवचीकता कमी होते आणि त्या कडक होतात. या शिवाय महिलांचे हार्मोन नसांच्या भिंतीला रुंद करत असल्याने ही समस्या होऊ शकते. गर्भवती महिला, गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रिया किंवा रजोनिवृत्तीच्या काळात जात असलेल्या महिलांनासुद्धा याचा त्रास होऊ शकतो. महिलांमधील हार्मोनच्या स्तरामध्ये बदल झाल्याने ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची सर्वाधिक जोखीम निर्माण होऊ शकते. आनुवांशिकता हेसुद्धा कारण ठरते. बराच वेळा उभे राहिल्याने हे आणखी वाढते. घट्ट कपड्यांमुळे रक्तवाहिनीतून वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे ‘व्हेरिकोज व्हेन्स’ धोका उद्भवू शकतो.
व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या कशी टाळू शकतो ?
जीवनशैलीचा सक्रिय व योग्य अवलंब करून ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या टाळू शकतो. या शिवाय, दीर्घकाळ उभे राहणे टाळायला हवे. जर तुमच्याकडे एखादे काम असेल ज्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ उभे राहण्याची गरज असेल तर त्यातून विश्रांती घ्यायला हवी. वजन नियंत्रणात आणले तरी ‘व्हेरिकोज व्हेन्स’ची समस्या कमी होण्यास मदत होते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.
‘व्हेरिकोज व्हेन्स’चा गुंतागुंत काय ?
‘व्हेरिकोज व्हेन्स’वर उपचार न केल्यास अल्सर, रक्तस्त्राव, त्वचेचा रंग खराब होणे आणि पायांना सूज येण्यासारखी गुंतागुंत होऊ शकते. काहींमध्ये नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते. ‘थ्रोम्बोफ्लिबिटिस’ वेदनादायक असते; परंतु धोकादायक राहत नाही आणि सामान्यतः उपचार करण्यायोग्य असते. सामान्यतः, थ्रोम्बोसिसमुळे पायाच्या नसामध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन फुप्फुसांना नुकसान होण्याचा धोका होऊ शकतो. ‘पल्मोनरी एम्बोलिझम’ ही एक जीवघेणी स्थिती आहे, ज्यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत.
सामान्य उपचार पद्धती काय आहे ?
वजन कमी करणे, झोपताना आपले पाय उशीवर उंच ठेवणे, दीर्घकाळ उभे राहणे टाळणे आणि सक्रिय राहिल्याने ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा धोका कमी करता येऊ शकतो. ‘कॉम्प्रेशन सर्जिकल स्टॉकिंग्ज’ आवश्यक आहे. सर्जिकल उपचारही केले जातात. बऱ्याच प्रकरणांमध्ये नसा ‘स्ट्रिपिंग’ आवश्यक आहे. ‘एंबुलेटरी फ्लेबेक्टॉमी’ ही बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणूनही केली जाते.