स्ट्रोकचे प्रकार किती ?
स्ट्रोकचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. पहिला आणि सर्वात सामान्य म्हणजे ‘इस्केमिक स्ट्रोक’ म्हणजे, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यावर होतो. दुसरा रक्तस्राव ‘स्ट्रोक’ आहे, जो मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे होतो. यात मेंदूच्या सभोवतालच्या ऊतींचे नुकसान होते. स्ट्रोकचा तिसरा प्रकार म्हणजे क्षणिक ‘इस्केमिक अटॅक’ याला ‘मिनी स्ट्रोक’ असेही म्हणतात. यात सामान्यतः पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ मेंदूला रक्त प्रवाह तात्पुरता अवरोधित होतो.
‘स्ट्रोक’ ही हृदयाची समस्या आहे का ?
काही लोकांना असे वाटते की ‘स्ट्रोक’ ही हृदयाशी संबंधित समस्या आहे, परंतु असे नाही ‘स्ट्रोक’ ही मेंदूची समस्या आहे. जी मेंदूतील धमन्या किंवा रक्तपुरवठा करणारी वाहिनी बंद पडल्यामुळे किंवा फुटल्यामुळे उद्भवते.
स्ट्रोक टाळता येतो का ?
स्ट्रोकसाठी सर्वात सामान्य जोखीम घटकांमध्ये उच्च रक्तदाब, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, मधुमेह आणि डोक्याला आघात आणि ‘कार्डियक एरिदमिया’ यांचा समावेश होतो. तुमच्या जीवनशैलीत बदल करून यातील अनेक घटक बदलले जाऊ शकतात. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे जोखीम घटक नियमित व्यायाम करून आणि योग्य आहार घेतल्याने कमी करता येतात.
काही कुटुंबांमध्ये ‘स्ट्रोक’ सामान्य आहे का ?
सिंगल ‘जीन डिसऑर्डर’, जसे की सिकलसेल रोग, अशा व्यक्तीमध्ये ‘स्ट्रोक’चा धोका वाढवतो. उच्च रक्तदाबाचा धोका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटकांसह आनुवंशिक घटकदेखील अप्रत्यक्षपणे स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात.
स्ट्रोकची सामान्य लक्षणे कोणती आहेत ?
चेहरा निस्तेज होणे, चेहऱ्याची एक बाजू सुन्न पडणे, हास्य असामान्य होणे, एक हात कमकुवत होणं किंवा सुन्न पडणे, हात वर केल्यावर हळूहळू खाली येणे, बोलण्यात अडचण येणे, अस्पष्ट बोलणे आदी ‘स्ट्रोक’चा सुरुवातीची लक्षणे आहेत. याशिवाय, एक किंवा दोन्ही डोळ्यांनी पाहण्यात अडचण येणे, चालण्यात अडचण येणे, चक्कर येणे, समतोल राखता न येणे आणि कोणत्याही निश्चित कारणाशिवाय डोकेदुखी ही सुद्धा लक्षणे दिसून येतात.
‘स्ट्रोक’वर उपचार आहे का ?
‘स्ट्रोक’वर आपत्कालीन उपचार इंजेक्शनने केला जाऊ शकतो. अनेक रुग्णांमध्ये रक्ताची गुठळी यांत्रिक पद्धतीने काढून टाकून किंवा अगदी शस्त्रक्रियेद्वारे काढली जाते. यासाठी रुग्णाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचावे लागते. विशेषतः लक्षणे सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत किंवा काही तासांत उपचार आवश्यक ठरतात. त्यामुळे, ‘स्ट्रोक’ सुरू झाल्यावर, बोलण्यात त्रास, दुहेरी दृष्टी, अर्धांगवायू किंवा बधिरपणा यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने योग्य रुग्णालय गाठणे गरजेचे असते.
स्ट्रोक फक्त वृद्धांनाच होतात का ?
‘स्ट्रोक’च्या संबंधात वय हा एक महत्त्वाचा घटक आहे. ५५ वर्षांच्या वयानंतर दर दहा वर्षांनी ‘स्ट्रोक’चा धोका दुप्पट होतो. तथापि, हे कोणत्याही वयात होऊ शकते.