आकस्मिक मृत्यूंचा कोरोना संसर्ग किंवा लसीकरणाशी संबंध आहे का ?
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ ने (आयसीएमआर) एक डेटा सादर केला आहे, यात तरुणांच्या आकस्मिक मृत्यूचा कोरोना लसीकरणाशी काहीही संबंध नाही, उलट त्यांना या लसीकरणामुळे संरक्षण मिळाले आहे.
‘आयसीएमआर’चा अभ्यासाचा कालावधी किती होता ?
‘आयसीएमार’ने ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान अज्ञात कारणांमुळे अचानक मृत्यू झालेल्या तरुणांचा अभ्यास केला. हे १८ ते ४५ वयोगटांतील लोक होते, ज्यांना कोणत्याही आरोग्य समस्या नव्हत्या, या अंतर्गत ७२९ प्रकरणांचा अभ्यास केला.
मृत व्यक्तीचा कोणकोणता अभ्यास करण्यात आला ?
‘आकस्मिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, ‘रीक्रिएशनल ड्रग’ आणि मद्यपान, उच्च तीव्रतेच्या शारीरिक हालचाली, कोविड संसर्गामुळे रुग्णालयात दाखल, कोविड लसीकरण आणि कौटुंबिक आरोग्य इतिहास आदींचा अभ्यास करण्यात आला.
अचानक मृत्यू आणि कोविड लसीकरणाबाबत ‘आयसीएमआर’ चा अहवाल काय होता ?
‘आयसीएमआर’ने ७२९ प्रकरणांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला, कोविड लसीमुळे भारतातील तरुणांमध्ये अचानक, अस्पष्ट मृत्यूचा धोका वाढला नाही. खरे तर एक डोस दिल्याने अचानक मृत्यूचा धोका कमी झाला.
तारुण्यात आकस्मिक मृत्यूचे कारण काय असू शकते ?
कुटुंबातील आकस्मिक मृत्यूचा इतिहास, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणे, मृत्युपूर्वी ४८ तासांचे अति मद्यपान, ‘रीक्रिएशनल ड्रग’चा वापर आदी आकस्मिक मृत्यूशी संबंधित होते.
कोरोनाचा गंभीर संसर्गानंतर कोणती काळजी घ्यावी ?
ज्यांना कोरोनाची गंभीर समस्या होती, त्यांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान दोन ते तीन वर्षे कठोर परिश्रम करू नयेत.
हृदयविकाराच्या झटक्याने तरुण का मरत आहेत?
गंभीर कोविड संसर्गाशी संबंधित घटकांव्यतिरिक्त, जीवनशैलीच्या सवयीही अचानक मृत्यूशी संबंधित आहेत. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने स्ट्रोक, हृदयाची अनियमित लय आणि अचानक ‘हार्ट फेल’ होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने ईसीजीमध्ये बदल होऊन अचानक येऊ शकतो. अति शारीरिक हालचालीही काही प्रकरणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका तिप्पट करू शकतात.
तरुणांमधील आकस्मिक मृत्यू कसे रोखायचे ?
हे लक्षात ठेवले पाहिजे की, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि ‘हाय ब्लड ग्लुकोज’ हे बहुतेक तरुणांमध्ये ‘सायलेंट डिसऑर्डर’ आहेत. यामुळे वार्षिक तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत. धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळायला हवे. जिमला जाण्यापूर्वी संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी.